कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी घट; 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले; 5984 नवीन रुग्ण

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेच. शिवाय दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. कोराना रुग्णांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट होत असून आज दिवसभरात 5984 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 86.48 टक्क्यांवर पोहोचले असून 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 लाख 84 हजार 879 झाली असून सध्या 1 लाख 73 हजार 759 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश पाटील यांनी दिली. रुग्णसंख्या कमी होत असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. दिवभरात 125 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के आहे. आजपर्यंत 81 लाख 85 हजार 778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 1 हजार 365 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 24 लाख 14 हजार 577 व्यक्ती होम क्वॉरंटाइन असून 23,285 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात1233 कोरोना रुग्ण

दिवसभरात आज मुंबईत 1233 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 092 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 2 लाख 12 हजार 905 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 45 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 45 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 776 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 95 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 18 हजार 624 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 13 लाख 63 हजार 205 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 43 हजार 172 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या