कोरोना पसरतोय, केंद्राचाही अलर्ट, केरळात सर्वाधिक लागण… मुंबईत आढळले 56 रुग्ण

सिंगापूर, हाँगकाँगसह चीनमध्ये कोरोना झपाटय़ाने वाढत असताना हिंदुस्थानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या 257 वर पोहोचली आहे. देशात सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारी म्हणून केंद्राने ‘कोरोना अलर्ट’ जारी केला आहे. सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून मुंबईत 56 रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 56 रुग्ण आढळले असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च 2020 मध्ये मुंबईत शिरकाव केलेला कोरोना तब्बल तीन वर्षे थैमान घातल्यानंतर पूर्ण आटोक्यात आला. मात्र आता परदेशात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने हिंदुस्थानमध्येही चिंता वाढली आहे. यातच मुंबईत पालिकेच्या केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोन रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबई महानगरपालिकाही अॅलर्ट मोडवर आली आहे. मुंबईत सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने काळजी करण्याचे कारण नसले तरी कोरोनासदृश लक्षणे असल्यास काळजी घ्यावी, मास्क वापरावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये अशी गाइडलाइन पालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

अशी कोरोना लक्षणे

कोरोनामध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळतात. शिवाय सर्दी, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही दिसतात.

अशी घ्या काळजी

– लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा.
– इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे, गर्दीत जाणे टाळा.
– साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवत रहा.
– योग्य आहार घ्या, लक्षणे असेपर्यंत आराम करा. ः

अफवांवर विश्वास ठेवू नका!

राज्यात कोरोना काहीसा वाढलेला दिसत असला तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या आरोग्य विभागाकडून स्थितीचा आढावा घेतला जात असून राज्य शासन सर्व आजारांचा सामना करण्यासाठी सक्षम असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयेही सज्ज

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये पालिकेने मुंबईत 150 रुग्णालयांमधील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले होते. याच धर्तीवर रुग्णवाढ झाल्यास आणि पालिकेने बेडची मागणी केल्यास खासगी रुग्णालयांमधील बेड उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती खासगी रुग्णालय समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितली.