चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्यालयात सापडले कोरोनाचे रुग्ण, दोन्ही इमारत सील

806

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेची इमारत एकाच दिवशी सील करण्यात आली आहे. या दोन्ही इमारतीत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेच्या बाधित अधिकाऱ्यावर बेजबाबदार वर्तनाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेले पाच महिने कोरोना विरोधातील लढ्यात सक्रियतेने काम करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आज सील करण्यात आले. याच कार्यालयातून जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणाचे काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील 3 लिपिक कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच स्वॅब टेस्ट घेण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालय याआधीच सर्व खबरदारी घेत असताना रविवारी 1 दिवस स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्यातरी बाधित कर्मचाऱ्यांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून बाधितांच्या संपर्कातील इतरांच्या तपासणीनंतर पुढचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

दरम्यान आजच चंद्रपूर जिल्हा परिषदेची मुख्य इमारत सील करण्यात आली आहे. या कार्यालयाशी संबंधित एक कक्ष अधिकारी बाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अवैधरीत्या नागपुरात वास्तव्याला असलेला हा अधिकारी बदली प्रक्रियाच्या निमित्ताने अचानक जिल्हा परिषदेत आला होता. हे लक्षात आल्यावर त्याला अलगीकरणात कक्षेत पाठवण्यात आले होते. त्याच्या स्वॅब टेस्ट दरम्यान तो बाधित असल्याचे आढळून आले. यानंतर लगेच जिल्हा परिषद कार्यालयात फवारणी व निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. पुढचे 3 दिवस जिल्हा परिषद इमारत सील राहणार असून बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत बाधित कक्ष अधिकार्‍यावर गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या