कोरोनाग्रस्ताचा अहवाल व्हायरल करणाऱ्याविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

1207

जळगाव शहरातील कोरोनाग्रस्त रुगणाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याबाबतची पोस्ट तपासणी अहवालासह व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची ओळख पटू नये तसेच ओळख पटविण्यास कारणीभूत व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावेत असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, 28 मार्च रोजी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका 49 वर्षीय व्यक्तिच्या स्वॅबची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जळगावच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला.

त्यानंतर काही तासात हा चाचणी अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख समोर आली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज 29 मार्च रोजी घेतलेल्या बैठकीत अहवाल व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तपासणी अहवाल व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या