कोरोना उपचारात प्लाझ्मा थेरपीच बेस्ट!

कोरोना काळात रुग्णांना देण्यात आलेली प्लाझ्मा थेरपी ही प्रभावी ठरली. या थेरपीमुळे अनेक रुग्णांत सकारात्मक परिणाम जाणवले. त्यामुळे यापुढेही ही प्लाझ्मा थेरपी रुग्णांवर सुरू ठेवणे आवश्यक असून त्यासाठी रुग्णांची योग्य निवड करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आणि संसर्ग रोग तज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले.

कोरोना रुग्ण कमी होत असतानाच प्लाझ्मा थेरपीबाबत आयसीएमआरकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. यामुळे प्लाझ्मा थेरपी द्यावी की देऊ नये याबाबत संभ्रम निर्माण झाला. यावर बोलाताना डॉ. ओम श्रीवास्तव म्हणाले, राज्य सरकारने आताही इनव्हेस्टिगेटिव्ह इनिशियल ट्रायल्स सुरूच ठेवायला हव्यात. जगभरात प्लाझ्मा थेरपीच्या 640 हून अधिक ट्रायल्स होत आहेत.

आयसीएमआरने आपत्कालीन स्थितीत प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत नसल्याचे म्हटले आहे. पण एखादा रुग्ण अशा स्थितीत जाण्याची वाट बघण्यापेक्षा, त्याआधी त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार झाले तर तो रुग्ण अधिक गंभीर होणारच नाही. तो त्यातून पूर्ण बरा होऊ शकतो.

थेरपीमुळे रुग्णांना फायदा

  • कोरोना काळात मुंबईतील अनेक डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली. त्यातून रुग्णांना फायदाच झाला आहे. त्यामुळे केवळ काही किस्स्यांवरून निष्कर्ष काढण्यापेक्षा कोणत्या वेळी प्लाझ्मा द्यायला हवा आणि तो कोणत्या रुग्णाला द्यायला हवा, हे ठरवायला हवे, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.
  • एखाद्या रुग्णाला विषाणू संसर्ग झाल्यानंतर नऊ दिवसांच्या आत प्लाझ्मा द्यायला हवा किंवा त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या सहा ते 24 तासांत त्याची प्रकृती अधिक खालावण्याआधी द्यायला हवा असे डॉक्टरांचे मत आहे.
आपली प्रतिक्रिया द्या