कोरोनाला रोखण्यासाठी ‘मिशन लसीकरण’ वेगात,  आणखी 46 केंद्रांसाठी पालिकेचा केंद्राला प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेने आणखी 46 खासगी केंद्रांच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे पालिकेच्या लसीकरण केंद्रांसह 74 व्हॅक्सिनेशन सेंटर्सची संख्या सुमारे सवाशेपार जाणार असून दररोज एक लाखांवर डोस देता येणार आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पालिकेने आणखी प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोरोनाला खऱया अर्थाने रोखणाऱया लसीकरणाला  महत्त्व देण्यात येत आहे.

यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली जात आहे. सद्यस्थितीत पालिका, खासगी आणि राज्य सरकारच्या मिळून 74 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ही संख्या वाढवण्यासाठी पालिका वेगाने कार्यवाही करीत आहे. त्यामुळे लसीकरणही वाढले आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 45 हजार डोस देण्यात आले.

ही संख्या दिवसाला एक लाखांवर नेण्यासाठी पालिका वेगाने कार्यवाही करीत असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. मुंबईत आतापर्यंत साडेपाच लाखांहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

महापौरांकडून आढावा

मुंबईत काही विभागांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी एफ उत्तर विभागातील  स्थितीचा आढावा घेतला. तसेच केईएम, शीव रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन अधिकाऱयांकडून आढावा घेतला.

शिवाय ज्येष्ठांशी संवादही साधला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा, नगरसेवक अमेय घोले, केईएमचे अधिष्ठाता डॉ. हमंत देशमुख, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कस्तुरबाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते.

वरळीतही लवकरच लसीकरण केंद्र

पालिकेच्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील बीकेसी, गोरेगाव नेस्को, मुलुंड, दहिसर अशा ठिकाणी सध्या लसीकरण सुरू आहे. यामध्ये आता वरळी एनएससीआय डोम जम्बो कोविड सेंटरमध्येही लसीकरण सुरू केले जाणार असल्याची माहिती संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग वाढणार असून पहिला, दुसरा आणि तिसऱया टप्प्यातील 30 लाखांचे लसीकरण एप्रिल महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असेही डॉ. भारमल यांनी सांगितले.