आजपासून धारावीत कोरोना लसीकरण प्रशिक्षण सुरू, 2,500 कर्मचाऱयांना प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून येत्या काळात कोरोनावरील लसही उपलब्ध होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवार, 18 डिसेंबरपासून मुंबईतील पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱयांना कोरोना लसीकरण प्रशिक्षण देण्यात येणार असून याची सुरुवात धारावीपासून होणार आहे. टप्प्याटप्प्याने पालिकेच्या 24 वॉर्डमध्ये सुमारे 2500 कर्मचाऱयांना याचे प्रशिक्षण दिले जाणार असून 500 पथके तयार केली जाणार आहेत.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या ‘चेस द व्हायरस, ‘मिशनझिरो’ यासह राज्य सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मोठे यश येत आहे. दोन आठवडय़ांत कोरोना रुग्णांची संख्याही हजारच्या आत येत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्यूदरही कमी झाला असून स्थिती नियंत्रणात आली आहे.

अशावेळी कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. त्या पार्श्वभूमीवर, लसीकरण तातडीने व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिका शुक्रवारपासून लसीकरण राबवत असून त्याची सुरुवात धारावीपासून केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरण प्रशिक्षण असे होईल!

एक दिवसाचे हे प्रशिक्षण असून प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात लसीकरण कसे करावे, काय काय काळजी घ्यावी तसेच ओळख कशी पटवावी, याची माहिती आरोग्यसेवकांना, पालिका कर्मचाऱयांना दिली जाणार आहे. दुसऱया टप्प्यात केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘कोव्हीड आयटी ऍप’मध्ये व्यक्तीची माहिती कशी भरावी आणि त्याचा कसा वापर करावा, याची माहिती देण्यात येणार आहे.