कोरोनावरच्या लसीचं परीक्षण दुसऱ्या टप्प्यात, लहान मुले आणि वृद्धांवर प्रयोग यशस्वी

कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलं असताना एक चांगली बातमी येत आहे. कोरोनावरील लस शोधण्यात इंग्लंड येथील शास्त्रज्ञांना यश आलं आहे. तसंच, या लसीच्या परीक्षणाचा दुसरा टप्पाही पार झाला असल्याचं वृत्त आहे. या टप्प्यात लहान मुलं आणि वृद्धांवर प्रयोग करण्यात आले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी या लसीचा प्रभाव आणि सुरक्षिततेची चाचणी जवळपास एक हजार जणांवर केली होती. त्यानंतर दहा हजारांहून अधिक लोकांवर याची चाचणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यात लहान मुले आणि वृद्धांचाही समावेश होता.

ही चाचणी यशस्वी झाली असली तरी अजून बऱ्याच टप्प्यांतून लसीला जावं लागणार आहे. अजूनही वृद्धांवर या लसीचा कितपत प्रभाव पडतो, त्याबाबत संशोधन करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्णतः विकसित अशी लस नेमकी कधी तयार होईल आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल हे सांगणं कठीण असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठात लस विकसित करणाऱ्या पथकाचे प्रमुख अँड्र्यु पोलार्ड यांनी सांगितलं आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातले संशोधक लस शोधण्याच्या कामाला लागले आहेत. या कामाला यश येत आहे. आज घडीला ऑक्सफर्ड, अमेरिकेचे कोडजेनिक्स आणि ऑस्ट्रेलियाची बायोटेक फर्म थेमिस इथे तुलनेने वेगात काम सुरू आहे. पुण्यातील सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्थाही वरील संस्थांनी विकसित केलेल्या लसीवर संशोधन करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या