कोरोना योद्धे म्हणता आणि डॉक्टरांना शहीद दर्जा नाकारता हा ढोंगीपणा आहे, आयएमएने मोदी सरकारला सुनावले

कोरोनाविरुद्ध लढणाऱया पहिल्या फळीतील या आरोग्य कर्मचाऱयांना आणि डॉक्टरांना ‘कोरोना योद्धा’ म्हणावे असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हटले जात नाही, हा निव्वळ ढोंगीपणा आहे अशा शब्दांत देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱया इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मोदी सरकारवर टीका केली आहे.

आयएमएने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 382 डॉक्टरांची यादी केंद्र सरकारला पाठवत या डॉक्टरांना शहीद दर्जा द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. एकीकडे सरकार आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना योद्धे म्हणते आणि दुसरीकडे कोरोनामुळे रुग्णसेवा करणाऱया किती जणांचा प्राण गेला हे सरकारला ठाऊक नाही असं म्हणत आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी सरकारी धोरणांबद्दल नाराजी क्यक्त केली आहे.

देशसेवा करण्यासाठी झटत असलेले माझे सहकारी असणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांची ही विडंबना आहे. जर आम्ही राज्यांतर्गत येणारा विषय असू तर यापेक्षा आमची अधिक विडंबना काय असू शकते? कोरोना योद्धे म्हणता आणि डॉक्टरांना शहीद दर्जा नाकारता हा निव्वळ ढोंगीपणा असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

राज्यसभा खासदार बिनॉय विस्कम यांनी डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्यापैकी किती जणांना कोरोनाची बाधा झाली आणि किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न विचारला होता. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चोबे यांनी आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि अशाप्रकारची माहिती केंद्रीय स्तरावर आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे पाहिली जात नाही, असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

थाळी वाजवणे, दिवे लावणे यापेक्षा सुरक्षा महत्त्वाची
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱयांची माहिती उपलब्ध नाही असे सांगत केंद्र सरकारकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे यावरून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘‘थाळी वाजवणे, दिवे लावणे यापेक्षा कोरोना योद्धय़ांची सुरक्षा महत्त्वाची’’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रतिकूल डेटा-मुक्त मोदी सरकार! थाळी वाजवणे, दिवे लावणे यापेक्षा अधिक गरजेचे त्यांची सुरक्षा आणि सन्मान आहे. मोदी सरकार, कोरोना योद्धय़ांचा इतका अपमान का? असा संतप्त सवाल करत राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला जबाबदारीची आठवण करून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या