मजुरांच्या मदतीला धावण्याचे समाधान!

506

>>कविता राऊत

आशियाई गेम्ससाठी जानेवारी महिन्यापासून सज्ज होत होती. फेब्रुवारी महिन्यातही सराव केला. मात्र हिंदुस्थानात कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आणि लॉकडाऊन करण्यात आले. मार्च महिन्यापासून मी आमच्या घरीच आहे. नाशिकपासून 40 किमी अंतरावरील सासरच्या घरी माझे वास्तव्य आहे. या लॉकडाऊनमध्ये मजूरांना करण्यात आलेली मदत माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली.

मी लहानाची मोठी नाशिकमध्येच झाली. त्यामुळे तेथील वातावरणाबाबत चांगलेच ठाऊक आहे. एप्रिल-मे महिन्यांच्या दरम्यान ग्रामीण भागातून बहुतांशी मजूर शहरी भागाकडे येत असतात. त्यांना या महिन्यांमध्ये बरेच काम मिळते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना येथे येणे शक्य झाले नाही. अशा मजूरांचे हाल होऊ लागले. त्यामुळे कविता राऊत फाऊंडेशन व यशोदीपच्या माध्यमातून अशा गरजूंना किराणा मालापासून दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यापुढेही अशी कामे करीत राहणार. या समाजसेवेमुळे मनाला खूप समाधान मिळते.

मार्च महिन्यात महाराष्ट्रासह हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर माझा संपूर्ण वेळ माझे पती, सासू सासरे व लहान मुलासह नाशिकमध्ये घालवतेय. माझे बाळ लहान असल्यामुळे जेवणात काही स्पेशल या कालावधीत करता आले नाही. पण साबुदाणा वडा, मिसळ व केक हे पदार्थ बनवत कुटुंबातील व्यक्तींना खूश करण्याचा प्रयत्न केला.

मी एक ऍथलीट असल्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीतही फिटनेसवरही गांभीर्याने लक्ष द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमध्येही मी पहाटे साडे चार वाजता उठून सराव करायची. यामध्ये रोड रनिंग, ट्रॅक रनिंगचा समावेश असायचा. प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात हा सराव पहाटे सहा वाजेपर्यंत चालत असे.

कोरोना हे खरेतर जगासाठी अत्यंत वाईट आहे. पण याच कोरोनामुळे माझ्यासाठी एक फायदा झालाय. याआधी टोकियो ऑलिम्पिक हे माझ्या डोळ्यांसमोर नव्हते. आशियाई गेम्ससाठी मी तयार होत होते. पण कोरोनामुळे आता टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता या स्पर्धेसाठी सज्ज होण्यासाठी मला पुरेसा अवधी मिळणार आहे. या क्रीडा महोत्सवासाठी पात्र होऊन देशाला पदक जिंकून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन.

सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत माझा सराव पुन्हा एकदा सुरू झालाय. अर्थात अजूनही स्टेडियममध्ये जाऊन सराव करीत नाही. हिल ट्रेनिंगसह आदी कसरती सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यापासून आमच्या स्पर्धाही सुरू होणार आहेत. त्यामुळे यापुढील प्रत्येक पाऊल माझ्यासाठी महत्त्वाचे असणार आहे.

आमच्या खेळात मोठा बदल होणार नाही
कोरोनामुळे सध्या तरी सांघिक खेळांवर जास्त परिणाम होईल अशी चिन्ह दिसताहेत. पण मी एक धावपटू आहे. रनिंगमध्ये खेळाडूंचा एकमेकांना जास्त संपर्क होत नाही. त्यामुळे या खेळामध्ये मोठे बदल होतील असे दिसत नाही. अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये या आजाराबाबत भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून खेळाडूंपर्यंत सर्वच जण दैनंदीन व्यवहारात काळजी घेतील यात शंका नाही.

(टीप – लेखिका हिंदुस्थानची धावपटू आहे)

आपली प्रतिक्रिया द्या