धोक्याची घंटा, कळवा खारेगावमध्ये आढळला कोरोना रुग्ण; 39 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

19695

महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 वर पोहोचला असतानाच कळवा खारेगावमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाची बाधा झालेला रुग्ण 39 वर्षीय तरुण आहे. विशेष म्हणजे त्याचा विदेशातील प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. यामुळे आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. तरुणाला कोरोनाची लागण कशी झाली याचा सध्या तपास सुरू आहे. कम्युनिटी स्प्रेडची ही केस असू शकते. त्यामुळे धोका वाढला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने सुरुवातीला लक्षणे आढळून आल्यानंतरही माहिती लपवली. त्यामुळे कोणाला याबाबत माहिती मिळाली नाही. हा रुग्ण स्वतःहून एक खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला गेला होता. त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये भरती झाला. सध्या या रुग्णांवर फोर्टीसमध्ये उपचार सुरू आहे.

हा तरूण कळवा खारेगाव येथे भाडेकरू तत्वावर रहात आहे. तो आयटी कंपनीत नोकरी करीत आहे. मागील आठवड्यात न्यूयाॅर्क येथून आलेल्या शिष्टमंडळाशी त्याचा संपर्क आला होता. सलग दोन दिवस हा तरूण संबधितांच्या संपर्कात राहिल्याने ही लागण झाली असावी, असा संशय आहे.

दरम्यान, या रुग्णामुळे कळवा येथी त्याची राहती सोसायटी, तो ज्या लॅबमध्ये गेलेला ती लॅब हे सर्व सील करण्यात आले असून तपासणी सुरू आहे. तसेच रुग्णाच्या घरातीळ 9 लोकांना देखील कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

देशात कोरोना रुग्णांचा आणि मृतांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यत 659 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील 125 रुग्ण महाराष्ट्रमधील आहेत. महाराष्ट्र पाठोपाठ केरळ मधील आकडा 100 पार गेला आहे. देशात कोरोनामुळे 15 मृत्यू झाले असून यातील 4 जण महाराष्ट्रमधील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या