
परभणीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला असं वृत्त आल्याने तिथल्या नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र हा रुग्ण मूळचा हिंगोलीला राहणारा असल्याचं कळाल्यानंतर ही चिंता कमी झाली आहे. विशेष म्हणजे तो फार लोकांच्या संपर्कात आलेला नाहीये. त्याला त्याच्या मेव्हण्याने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कळाली आहे. हा रुग्ण पुणे येथून हिंगोलीला जात होता. त्याने वाटेत परभणीला मेव्हण्याला भेटायचं ठरवलं होतं. तो आलेला पाहताच मेव्हण्याने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ज्यामुळे त्याचा इतर लोकांशी फार संपर्क आलेला नाही. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त नव्हता, यामुळे हा जिल्हा ग्रीन झोन म्हणून गणला जात होता. पुण्याहून आलेल्या हिंगोलीच्या या रुग्णामुळे आता हा जिल्हा ग्रीन ऐवजी ऑरेंज झोनमध्ये गेला असल्याची चर्चा आहे. हा रुग्ण कोणाच्याही संपर्कात आलेला नसल्याने काळजी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचे आतापर्यंत चांगल्या पद्धतीने पालन करण्यात आले आहे. असं असलं तरी चारठाणा ग्रामपंचायत हद्दीत मात्र अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही जण विनाकारण दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून आले आहे. बेकायदेशीररित्या आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाला सेलू तालुक्यातील मौजे सावंगी पीसी येथील ज्योती विठ्ठलराव काळे व पाथरी तालुक्यातील मौजे फुलेरवाडी येथील रानबा जगन्नाथ फुलवरे हे दोन रास्तभाव दुकानदार धान्य वाटपामध्ये गडबड करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या दोघांवरही आवश्यक ती कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

























































