लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथीलता आणा, परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या प्रभावानुसार आणि रुग्णांच्या संख्येनुसार जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशी विभागणी करण्यात आली आहे. परभणी जिल्हा हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोनमध्ये लवकरच जाण्याची शक्यता आहे. यामुळे परभणी जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथीलता आणावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील केली. त्यांनी ही विनंती करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची शुक्रवारी संध्याकाळी भेट घेतली होती.

राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या काही जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे तिथले व्यवहार काही अंशी सुरु झाले आहेत. परिणामी तिथलं आर्थिक चक्रही फिरायला लागलं आहे. यामुळेच शिवसेनेच्या खासदारांनी आणि आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना परभणीमध्येही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणा अशी विनंती केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.