…तर देशात दररोज 2 लाख 87 हजार कोरोना रुग्ण आढळतील, ‘एमआयटी’च्या संशोधकांचा धक्कादायक अहवाल

2680

देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना एमआयटीच्या संशोधकांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूवर पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लस सापडली नाही तर देशात दररोज 2 लाख 87 हजार रुग्ण आढळतील. 84 देशांच्या कोरोना चाचण्या आणि कोरोना डेटावर आधारित हा अहवाल आहे.

हिंदुस्थानमध्ये सध्या दररोज 20 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत असून मृतांचा आकडा 20 हजार पार गेला आहे. मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असले तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एकीकडे रुग्ण वाढत असताना ‘एमआयटी’च्या संशोधकांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली. एमआयटीचे संशोधक हाजहिर रहमनदाद, टी. वाय. लिम आणि जॉन स्टरमॅन यांनी केलेल्या अभ्यासानंतर 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात देशात 2 लाख 87 हजार रुग्ण आढळतील असा दावा केला आहे.

2021 मध्ये मे महिन्यात जगभरातील रुग्णांचा आकडा 20 ते 60 कोटींवर पोहोचेल. कोरोनावर लस मिळाली नाही तर सर्वात वाईट परिस्थिती हिंदुस्थानची असणार आहे. देशात 2 लाख 87 हजार रुग्ण आढळतील, तर अमेरिकेत 95 हजार, दक्षिण आफ्रिकेत 21 हजार आणि इराणमध्ये 17 हजार रुग्ण दररोज आढळतील, असाही दावा या संशोधकांनी केला आहे.

देशातील आकडा 8 लाखांकडे सरकतोय
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22,752 ने वाढला असून आतापर्यंतचा आकडा 7,42,417 झाला आहे. देशात सध्या 2,64,944 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 4,56,831 रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या 24 तासात 482 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 20,642 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या