आणखी एका नर्सला कोरोनाची लागण; भोसरी, गव्हाणेवस्ती, संभाजीनगर सील

1081

पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील रुग्णालयात नोकरी करत असलेल्या आणखी एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे आज (बुधवारी) स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 31 झाली आहे. दरम्यान, महापालिकेने आज रात्री 11 वाजल्यापासून संभाजीनगर, दिघीरोड, भोसरी, गव्हाणे वस्ती हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ही नर्स वास्तव्याला आहे. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नर्स नोकरीला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नर्स काही दिवसांपासून रुग्णालयातच वास्तव्याला होती. या नर्सचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी शहरात राहणा-या आणि पुण्यातील खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 44 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 31 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 27 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, चार सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काल रात्री पॉझिटीव्ह आलेले सहा रुग्ण आणि आजची पॉझिटीव्ह आलेली नर्स खराळवाडी, दिघीरोड, भोसरी, गव्हाणे वस्ती आणि संभाजीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे गव्हाणे वस्ती, संभाजीनगर हा भाग आज रात्री 11 वाजल्यापासून सील केला आहे. खराळवाडी परिसर यापुर्वीच सील केला आहे. या परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या