लाठीपासून बुक्क्यापर्यंत, नाठाळांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांचे हरतऱ्हेचे प्रयत्न

1059

भले तर देऊ कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी | असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये संचारबंदी, जमावबंदीचे नियम मोडणाऱ्यांच्या काठ्या पोलिसांनी हाणल्या आहेत. याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले मात्र तरीही काही नाठाळ सुधरायला तयार नाही. यामुळे पंढरपुरात पोलिसांनी काठी ऐवजी बुक्क्याने फरक पडतोय का हे तपासून पाहण्याचे ठरवले.

लॉक डाऊन म्हणजे काय, संचार बंदीचा अर्थ काय, कोरोना मुळे काय होते असे नानाविध प्रश्न करुन पोलिसांनी भटक्यांचे चांगलेच कान उपटले. पंढरपूरचे उपअधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या संकल्पनेतून लोकजागृतीसाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस सकाळी रस्त्यावर उतरले होते. मात्र त्यांनी आज खाकी वर्दी घातली नव्हती तर ते वारकऱ्याच्या वेषात रस्त्यावर आले होते. यामुळे जेव्हा त्यांनी भटक्यांना अडवायला सुरुवात केली तेव्हा त्यांची काही काळ फसगत झाली. आपल्याला पोलिसाने अडवलंय हे कळाल्यानंतर मात्र या विनाकारण रस्त्यावर उंडारत फिरणाऱ्यांची बोबडी वळली होती.

पंढरपुरात कोरोनाबाबत पोलीस सातत्याने जनजागृती करत आहे. ते नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत आणि गरजवंतांना मदतही करत आहेत. मंगळवारी सकाळी संचारबंदी असताना मोटरसायकल वरुन अकारण फिरणाऱ्या नागरिकांनी पोलिसांनी अडवायला सुरुवात केली. लाठ्या-काठ्या खाव्या लागतील हे माहिती असूनही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना पोलिसांनी कपाळावर बुक्का लावला. कशाला घराबाहेर पडलात ? संचारबंदी आहे माहिती नाही का ? असे प्रश्न विचारले. ज्यांनी अत्यंत बेजबाबदारपणे उत्तरे दिली त्यांना बुक्का लावल्यानंतर काठीचाही प्रसाद दिला. मात्र जी मंडळी खरोखरच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडली होती, त्यांना पोलीस तत्परतेने मदत करत होते.

आपली प्रतिक्रिया द्या