
कोरोनाचा प्रसार झालेल्या आखाती देशातून 31 मार्च दरम्यान देशात येणाऱ्या 26 हजार हिंदुस्थानींची व्यवस्था करण्यासाठी मुंबईतील क्वारेंटाईन केंद्रांची क्षमता वाढवली जाणार आहे. ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, पण ते निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह, याचा वैद्यकीय अहवाल मिळालेला नाही, अशा कोरोनाच्या संशयित रुग्णांना आणि ज्यांची घरे मुंबईत आहेत अशांना मुंबईतच 14 दिवसांसाठी क्वारेंटाईन केंद्रांमध्ये ठेवले जाणार आहे.
अंधेरीमधील सेव्हन हिल रुग्णालयातील बेडची संख्या 300वरून 1000 केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या इंजिनीयरना ट्रेनिंगसाठी नुकतेच पवई येथे उभारण्यात आलेले केंद्र क्वारेंटाईन केंद्र म्हणून सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी सुमारे 100 बेड तयार ठेवले आहेत. पालिका, खासगी रुग्णालये, हॉटेल्स, मध्य आणि पश्चिम रेल्वेची रुग्णालये तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये विलगीकरण केंद्रे (क्वारेंटाईन) उभारली जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.




























































