कोरोनासोबत पावसाळी आजारांचा सामना; सज्ज रहा!

कोरोनासोबत लढा सुरू असतानाच मुंबईसह राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता पावसाळ्यातील आजारांचाही मुकाबला करावा लागणार आहे. कोरोनासोबत या आजारांचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. मुंबईत क्वारंटाइनची सुविधा काढवितानाच ट्रॅकिंग आणि टेस्टिंगचे प्रमाणही वाढवावे. या काळात मृत्यूदर रोखण्यासाठी यंत्रणांनी एकमेकांत समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱयांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनासंदर्भातील राज्याच्या कामाचे केंद्रीय पथकानेही कौतुक केले आहे. मुंबईत यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र लढाई अजून संपलेली नाही. कोरोनाचे रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे, ते कमी झाले पाहिजे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्टेरॉईड दिले जाते. त्याबाबत सर्व कोरोना रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात आणि त्यानुसारच उपचारात त्याचा वापर केला जावा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सव काळात आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मादानासारखे उपक्रम मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, परिवहन मंत्री ऍड अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त, सह आयुक्त, वॉर्ड अधिकारी आदी सहभागी झाले होते.

डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा!
मुंबईत ज्या ठिकाणी अर्धवट बांधकामे होऊन इमारती ओस पडलेल्या आहेत अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती केंद्रे होऊ नये याकरिता फवारणीचे काम हाती घ्यावे. भूमिगत कामांच्या ठिकाणी देखील पाणीसाठा होऊन डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ शकतात ते वेळीच नष्ट करा असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांवरील खड्डे, दुरुस्तीला प्राधान्य द्या!
महापालिकेने एमएमआरडीए, रेल्वे, बीपीटी, मेट्रो, एअरपोर्ट ऑथोरीटी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यासारख्या सर्व संबंधित यंत्रणांची समन्वय बैठक आयोजित करून सर्व कामांना गती द्यावी. रस्त्यांच्या खड्डय़ांसाठी सर्व संबंधित यंत्रणांचे एकत्रित पथक स्थापन करण्यात यावे. रस्ता कुणाच्याही ताब्यातील असो, त्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि रस्ता दुरुस्तीचे कामांना प्राधान्य द्या असे मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या