हवेतूनही पसरतो कोरोना विषाणू? शास्त्रज्ञांचा दाव्यावर WHO कडे संशोधनाची मागणी

1017

जगभरात थैमान घालून अनेकांचे बळी घेणाऱ्या कोरोना विषाणू संदर्भात एक नवीन संशोधन झाल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत कोरोना विषाणू संक्रमित व्यक्तिकडून फक्त द्रवातूनच पसरत असल्याची माहिती उघड झाली होती. मात्र, आता काही शास्त्रज्ञांनी हा विषाणू हवेतूनही पसरत असल्याचा दावा केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूवरील लसीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच त्याच्यावरील उपाययोजनेसाठी कोरोनाच्या प्रसाराचे स्रोतही शास्त्रज्ञ शोधत आहेत. यापूर्वीपर्यंतच्या शोधात संक्रमित व्यक्तिच्या थुंकी, शिंक, खोकला इत्यादींतून पडणाऱ्या स्रावातून या विषाणूचा प्रादुर्भाव होतो, असं आढळलं होतं. मात्र, जगभरातील 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात विषाणू हवेतीही काही काळ जिवंत राहतात आणि ते लोकांना संक्रमित करू शकतात, असं आढळलं आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने या संबंधीचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालात शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे या संबंधी संशोधन करण्याची मागणीही केली आहे. अर्थात या संशोधनाने तो हवेतून पसरतोच याचा कोणताही दावा केलेला नाही. किंवा जे नमुने सादर करण्यात आले, त्यातूनही ते संपूर्णतः सिद्ध होत नाही. याआधी जागतिक आरोग्य संघटनेने फक्त द्रवातूनच याचा फैलाव होतो, असं स्पष्ट केलं होतं. मात्र, आता या दाव्यामुळे नव्याने यावर संशोधन व्हावं असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या