
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी मास्क लावणे, गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र, अमेरिकेत मास्क लावण्यास अनेकांचा विरोध आहे. तसेच गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात येत नाही. कोरोना रोखण्यासाठीचे नियम पाळणे म्हणेज अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर हल्ला असल्याचे अमेरिकेतील काही नागरिकांचे मत आहे. त्याची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे. अशा घटनांमुळे अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या बाइक रॅलीमुळे सुमारे अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
एका रिसर्च ग्रुपने या रॅलीनंतर केलेल्या अभ्यासातून ही बाब स्पष्ट झाली आहे. अभ्यासकांनी 63 पानांच्या अहवलात कोरोनाचा फैलाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसा झाला ते स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने हा अहवाल कल्पनाविलास असल्याचे सांगत रॅलीमुळे कोरोना संक्रमण वाढले नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील दक्षिण डकोटामध्ये 7 ते 16 ऑगस्टदरम्यान बाइक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रॅलीनंतर डकोटा आणि इतर भागात कोरोनाचे संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सॅन डियागो स्टेट युनिव्हर्सिटीने याबाबतचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यातील आकडेवारी धक्कादायक आहे. सुपर स्प्रेडर ( झपाट्याने रोगाचा फेलाव करणारा व्यक्ती) किती लोकांना संक्रमित करू शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या अभ्यासातून करण्यात आला आहे. या बाइक रॅलीमुळे स्थानिक प्रशासनाला फायदा झाला आहे. मात्र, त्यामुळे झालेल्या कोरोना फैलावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
डकोटाचे गवर्नर क्रिस्टी नोएम यांनी हा अहवाल म्हणजे कल्पना असल्याचे म्हटले आहे. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणाऱ्यांवर आणि जीवनाचा आनंद घेणाऱ्यांवर या अहवालातून हल्ला करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. या रॅलीत सहभागी झालेल्या 124 लोकांना संक्रमण झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या रॅलीत सहभागी झालेल्यांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात या रॅलीमुळे अडीच लाखांपेक्षा जास्त व्यक्ती संक्रमित झाल्याची शक्यता आहे. मात्र, आता त्यांचे ट्रेसिंग करून त्यांना शोधणे कठीण असल्याचे अहवालाचे लेखक एन्ड्रू फ्रिडसन यांनी म्हटले आहे. या रिसर्च ग्रुपने याआधीही अमेरिकेत झालेली निदर्शने, प्रचार रॅली , विविध सभा यांचाही अभ्यास केला होता. त्यावेळीही कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून आले होते.



























































