लढणाऱ्या सैनिकांना नाराज करता येत नाही; डॉक्टरांच्या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court-of-india

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांना (डॉक्टर) असमाधानी ठेऊन चालणार नाही. युद्धात लढणाऱ्या सैनिकांना नाराज करता येत नाही, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहेत. आरोग्य यंत्रणेतील काम करणाऱ्यांसदर्भात केंद्र सरकारने अधिक विचार करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीसह देशातील काही भागांमधील डॉक्टरांना वेळेवर आणि पुरेसा पगार दिला जात नाही. तसेच त्यांना सुविधा पुरविल्या जात नाही. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने भूमिका मांडली. युद्धाच्या काळात लढणाऱ्या सैनिकांना त्रास देऊ नका. त्यांना नाराज करू नये. त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी अतिरिक्त पैशांची व्यवस्था करा, असेही न्यायालयाने सांगितले. आरोग्य कर्मचाऱयांचा पगाराचा मुद्दा सरकारनेच महत्वाचा प्रश्न म्हणून सोडविला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

डॉक्टर संपावर असल्याच्या बातम्या आम्ही वाचल्या आहेत. दिल्लीतील काही डॉक्टरांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढणाऱ्या सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा, असेही न्यायालयाने सांगितले.