24 दिवसांपासून कोरोनाग्रस्त चीनच्या शवागारात मृतदेह पडून

407

दैवगतीचा फेरा अनाकलनीय असतो म्हणतात तेच खरे. याचा प्रत्यय मुंबईचे दंतवैद्यक डॉ. पुनीत मेहरा (35) यांना आलाय. विमान प्रवासात जन्मदात्या आईला गमावले आणि आता तिचे पार्थिव कोरोनाग्रस्त चीनमधून मुंबईत आणायला अनंत अडचणी येताहेत. या स्थितीत आईच्या अंत्यदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या डॉ. मेहरा यांनी हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालय आणि चीन सरकारला साकडे घातले आहे.

डॉ. पुनीत मेहरा आपली आई रिटा राजिंदर मेहरा यांच्यासोबत 24 जानेवारीला मेलबर्नहून विमानाने मुंबईला परतत होते, पण बीजिंग शहरानजीक विमान येताच त्यांची आई विमानाच्या टॉयलेटमध्ये गेली ती परत बाहेर आलीच नाही. अखेर शोध घेतला असता रिटा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने चीनच्या झेंगझाऊ येथे दाखल केले. त्यासाठी विमानाला चीनमध्ये इमर्जन्सी लँडिंगही करावे लागले. रुग्णालयात रिटा यांचा दुर्दैवी अंत झाला. अखेर आपल्या आईचे पार्थिव शवागारात ठेवून डॉ. मेहरा मुंबईत परतले. चीनमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने सुमारे 24 दिवस रिटा मेहरा यांचे पार्थिव चीनच्या शवागारात पडून आहे. कोरोनाच्या भीतीने ते अन्यत्र पाठविण्यास चिनी प्रशासनाची परवानगी मिळण्यात अडचणी येत आहेत.

हिंदुस्थानी, चिनी प्रशासनही हतबल

डॉ. पुनीत मेहरा यांनी आपल्या आईच्या पार्थिवासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनमधील हिंदुस्थानी राजदूत अरविंद कुमार यांनाही पत्र लिहून मदतीचे साकडे घातले आहे. डॉ. मेहरा यांची व्यथा जाणून घेतल्यावर सर्वांनाच त्यांना मदत करायची आहे. चिनी प्रशासनानेही मेहरा यांच्या विनंतीची दाखल घेतली आहे. पण कोरोनाच्या भयंकर प्रसारामुळे डॉ. मेहरा यांच्या आईचे पार्थिव झेंगझाऊ येथील शवागारातून बीजिंग विमानतळावर आणण्यातही अनेक कायदेशीर प्रतिबंध आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करीत आहोत असे चीनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्त अरविंद कुमार यांनी डॉ. मेहरा यांना कळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या