कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली भीती

370

चीनमधील आर्थिक स्थिती ढासळवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता जागतिक अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण झाला आहे. चीनपाठोपाठ इतर देशांतही कोरोनाचा प्रसार झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासही मंदावणार आहे, अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) व्यक्त केली आहे.

नुकतीच रियाध येथे जी 20 वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकर्सची बैठक पार पडली. जगभरात वेगाने फैलावत असलेला कोरोना व्हायरस, वातावरणातील बदल आणि अमेरिका-चीनमधील क्यापार तणाक यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले. कोरोना व्हायरसच्या परिणामावर मत व्यक्त करताना आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जियाका यांनी सांगितले की, ‘कोरोना व्हायरस जगावरील सर्वात मोठी आपत्ती आहे. जागतिक स्तरावरील एवढय़ा मोठय़ा आरोग्य आपत्तीची जानेवारी महिन्यात आम्ही कल्पना केली नव्हती.’ सध्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळली असून ती पुढे कधी सावरेल हे आता सांगता येणार नाही.

कोरोनामुळे 2000 जणांचे मृत्यू; नव्या रुग्णांची संख्या घटली

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या चीनमधील नागरिकांची संख्या 2 हजार 118 झाली आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 74 हजार 576 वर पोहोचली असल्याने चीनमधील सरकारी अधिकाऱयांनी स्पष्ट केले. चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. फेब्रुवारीमध्ये 394 रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी 114 जणांचा मृत्यू झाला. यातील 108 जण हे हुबेईमधील आहेत.

जपानमधील क्रूझवरील दोघा जणांचा मृत्यू

जपानमधील क्रूझवरील कोरोनाग्रस्त दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. क्रूझवरील 80 वर्षीय एक महिला आणि पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. या दोघांनाही क्रूझवर वेगळे ठेवण्यात आले होते.

गुंतवणूकदारांचे नुकसान

चीन ही जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे, पण कोरोनाच्या परिणामामुळे चीनसह जागतिक अर्थव्यवस्थेलाही उतरती कळा लागली आहे. जागतिक मंदीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही ढासळत असल्याचे आयएमएफच्या बैठकीत सांगण्यात आले. आयएमएफने पॉलिसी तयार करणाऱयांना वित्तीय आणि आर्थिक धोरणांमध्ये समतोल राखण्याचे आवाहन केले. बहुतेक अर्थव्यवस्थांमध्ये अनुकूल राहण्यासाठी कमी चलनवाढीचे चलन धोरण आवश्यक असते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या