‘सोडियम हायपोक्लोराईट’च्या फवारणीचा आग्रह धरणे धोकादायक – महापौर किशोरी पेडणेकर

1635

‘कोरोना कोविड 19’च्या पार्श्वभूमीवर ‘सोडियम हायपोक्लोराईट’ची फवारणी करण्याचा आग्रह धरणे चुकीचे असून या रसायनाचे दुष्परिणाम लक्षात घेता विनाकारण त्याची फवारणी करणे धोकादायक ठरू शकते; त्यामुळे सरसकट फवारणी करणे टाळावे. त्याचबरोबर एखाद्या परिसरात अशी फवारणी करणे सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (SOP) गरजेचे असल्यास त्याठिकाणी पालिकेच्या यंत्रणेद्वारेच फवारणी करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी मंगळवारी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सरसकट फवारणीबाबत चिंता व्यक्त केली असून अशी फवारणी टाळण्याचे आणि फवारणी ही केवळ ठरलेल्या निकषांनुसारच करावी, असे निर्देश दिले असल्याचेही महापौर यांनी सांगितले. त्या मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीला मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या बैठकीला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह पालिकेतील वरीष्ठकारीदेखील उपस्थित होते.

आजच्या बैठकीदरम्यान काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या परिसरात ‘डिस इन्फेक्टंट’ची फवारणी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. या अनुषंगाने माहिती देताना प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी सांगितले‌ की, बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे रुग्णालये, दवाखाने, शौचालये इत्यादी ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या सोसायटी किंवा घरामध्ये फवारणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने फवारणी करण्याबाबत ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ (SOP) यापूर्वीच ठरविण्यात आली आहे. तथापि, दुर्देवाने काही ठिकाणी ही फवारणी काही व्यक्तींद्वारे स्वतःहून करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. कोणतीही तांत्रिक माहिती नसलेल्या किंवा सदर औषध किती प्रमाणात कुठे व कशामध्ये मिसळावे; याविषयी कोणतीही माहिती नसलेल्या व्यक्तींद्वारे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने फवारणी करण्यात आल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम सदर परिसरातील नागरिकांना भोगावे लागू शकतात. त्यामुळे अशी फवारणी गरज असेल तिथे व संबंधित‌ महापालिकेच्या यंत्रणेद्वारेच करणे गरजेचे आहे, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी आजच्या बैठकीत दरम्यान नमूद केले. ज्या परिसरात ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेले रुग्ण आहेत, अशा परिसराची नावे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत नगरसेवकांना कळविण्यात येतील, जेणेकरून सदर परिसरातील नागरिकांचे प्रबोधन व जनजागृती करण्याच्या कामी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य घेता येऊ शकेल. तथापि, ही माहिती देताना त्यामध्ये रुग्णाची नावे कळविण्यात येणार नाही; असा निर्णय आजच्या बैठकीत दरम्यान घेण्यात आला.

अशी होतेय फवारणी

  • ‘सोडियम हायोक्लोराईट’ची फवारणी ही केवळ पालिकेने निर्धारित केलेल्या निकषांनुसार करण्यात येईल. या निकषांनुसार ज्या रुग्णालयांमध्ये ‘कोविड १९’ रुग्ण दाखल आहेत, अशा रुग्णांमध्ये दररोज फवारणी करण्यात येईल.
  • ज्या महापालिका रुग्णालयांमध्ये ‘कोविड १९’ चे रुग्ण नाहीत; अशा रुग्णालयांसह‌ महापालिकेच्या मंडयांमध्ये साप्ताहिक पद्धतीने फवारणी करण्यात येईल.
  • ‘कोविड १९’ चे रुग्ण ज्या इमारतीत किंवा घरात वास्तव्यास होते; अशा इमारतींमध्ये व घरामध्ये आणि लगतच्या परिसरात साप्ताहिक स्वरूपात फवारणी करण्यात येईल.
  • प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून ज्याठिकाणी व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे, अशा ठिकाणी साप्ताहिक स्वरूपात फवारणी करण्यात येईल.
  • महापालिकेची विभाग कार्यालये, महापालिका दवाखाने, हेल्थ पोस्ट इत्यादी नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणी साप्ताहिक स्वरूपात फवारणी करण्यात येईल.

• वरील नुसार फवारणी करताना ती केवळ पालिकेच्या यंत्रणेमार्फतच केली जाईल. तसेच इमारतीच्या आतील भागात विभागीय कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांद्वारे फवारणी करण्यात येईल. तर बाहेरील भागात किंवा लगतच्या परिसरात महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे फवारणी करण्यात येईल.

• ‘सोडियम हायपो क्लोराईट’ची अतिरिक्त फवारणी ही सर्व नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आहे, अशी माहिती आजच्या बैठकीदरम्यान महापालिकेच्या कीटकनाशक अधिका-यांद्वारे देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या