मास्क नाही, सुनावणी नाही! तोंडावरील मास्क काढणाऱ्या वकिलाला हायकोर्टाची चपराक

कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी शासन सर्व त्या उपाययोजना करत आहेत. त्यातच हायकोर्टाने न्यायालयात येणाऱया वकिलांना मास्क बंधनकारक केले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. असे असताना भरकोर्टात तोंडावरील मास्क काढून नियमांची पायमल्ली करणाऱया एका वकिलाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी वकिलाची याचिका ऐकण्यास नकार दिला. एवढेच काय तर त्याची याचिकाही बोर्डावरून हटवली.

लॉकडाऊननंतर मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी घेण्यास सुरुवात झाली. न्यायालयाने हायकोर्टात येणाऱया  वकिलांसाठी पक्षकारांसाठी नियमावली तयार केली आहे. सुनावणीवेळी कोर्ट रूममध्ये मोजक्याच वकिलांना प्रवेश, सोशल डिस्टन्सिंग, युक्तिवाद करताना तोंडावर मास्क आदी मार्गदर्शक तत्त्वे हायकोर्टानी आखून दिली आहेत. सातारा येथील एका याचिकाकर्त्याकडून 2018 सालच्या वारसा हक्कासंदर्भात सिव्हिल अपील हायकोर्टात करण्यात आले होते. त्यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी होणार होती. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. निखिल वाडीकर व अॅड. नंदू पवार हे काम पाहत होते. मात्र याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुनावणीपूर्वी तोंडावरील मास्क काढल्याचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या निदर्शनास आले. हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत याचिकेवरील सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच यासंदर्भात दिलेल्या आदेशात वकिलांना घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने या याचिकेसाठी पुन्हा योग्य वेळ निश्चित करण्यात येईल असे म्हटले आहे.

युक्तिवादावेळी मास्क अनिवार्य

हायकोर्टात सुनावणीवेळी काही वकील कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दणक्यानंतर पुन्हा एकदा वकिलांसह पक्षकारांना कोर्टात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या