आतापर्यंत 786 पालिका शिक्षक क्वारंटाईन ड्युटीवर; 100 टक्के हजेरीची अट शिथिल

613

कोरोना रोखण्यासाठी क्वारंटाईन सेंटर्सवरील ड्युटीवर आतापर्यंत 786 पालिका शिक्षक हजर झाले आहेत. मात्र, 9 हजार शिक्षकांनी सरसकट 100 टक्के हजर झाले पाहिजे, ही अट पालिकेने शिथिल केली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, निरीक्षक, सेवक असे मिळून आतापर्यंत 878 पालिका कर्मचारी मुंबईतील विविध क्वारंटाईन सेंटर्समध्ये कर्तव्य बजावत आहेत.

मुंबईत कोरोनाचा प्रसार आणखी वाढला तर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था केली जाणार असून तेथील व्यवस्था पाहण्याची जबाबदारी त्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची असेल, असे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढले होते. मात्र, नंतर यातून खासगी शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले. परिपत्रक काढुनही शिक्षक हजर न झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या 9 हजार प्राथमिक शिक्षकांनी आपापल्या शाळेच्या परिसरात असलेल्या पालिका विभागीय कार्यालयात हजर राहावे, गैरहजर राहणाऱ्या शिक्षकांवर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आदेश पालिका प्रशासनाने जारी केले होते.

हजेरीचा सरसकट आदेश मागे!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षकांनी सरसकट 100 टक्के उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, हा नियम शिथिल करण्यात आला असून मुंबई आणि एमएमआरडीए क्षेत्रातील असणाऱ्या शिक्षकांना हजर राहणे बंधनकारक असून मुंबई, एमएमआरडीए क्षेत्राबाहेरच्या वाहन नसल्यामुळे अडकलेल्या शिक्षकांना, 55 पेक्षा जास्त वय असलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.

  • आतापर्यंत 786 शिक्षक, 23 मुख्याध्यापक, 4 प्रशासकीय अधिकारी, 13 विभाग निरीक्षक, 2 मुख्य लिपिक, 5 लिपिक, 36 शिपाई आणि 9 माळी असे मिळून एकूण 878 पालिका कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली असून ते मुंबईतील विविध क्वारंटाईन सेंटरमध्ये ड्युटी करत आहेत. यात ई विभागातून सर्वाधिक 164 शिक्षक तर 4 विभागातून सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एका शिक्षक सेंटरवर ड्युटी करत आहे.

‘अनेक शिक्षक मुंबईबाहेरील रेड झोनमध्ये अडकून पडले आहेत. अशा शिक्षकांकडे वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे ते शिक्षक मुंबईत येऊ शकत नाहीत. तिथे वाहतुकीच्या साधनांची व्यवस्था झाली तर ते शिक्षकही येऊ शकतील. तसेच सध्या रमजान सुरू आहे. रमजान संपल्यानंतर पालिका शाळेतील उर्दू शिक्षकांनाही क्वारंटाईन सेंटरवर ड्युटीसाठी बोलावण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांची संख्या वाढेल.’ – महेश पालकर, शिक्षण अधिकारी, पालिका

आपली प्रतिक्रिया द्या