चाकरमानी वेटिंग लिस्टवर, बस, ई-पास, क्वारंटाइन कालावधी, वैद्यकीय सुविधा यावर चर्चा

1097

दाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी या कालावधीत कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमानी अधीर झाला आहे. चाकरमान्यांना आता आणखी थोडा धीर धरावा लागणार आहे. कारण परवानगी मिळण्याची शक्यता असली तरी बस, ई-पास, क्वारंटाइनचा कालावधी, वैद्यकीय सुविधा यांचाही विचार करावा लागणार आहे. मंगळवारी त्या संदर्भातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोकणातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतील चर्चेचा तपशील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, असे परब यांनी सांगितले.

या बैठकीतील लोकप्रतिनिधींची मते व प्रशासनाची भूमिका याचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला जाईल. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मग त्या अनुषंगाने चाकरमान्यांचा प्रवास व इतर गोष्टींवर चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले.

चाकरमान्यांची संख्या समजेल

बस प्रवासासाठी जिल्हा बंदी व ई पासेसच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ई पास दिले तर कोकणात किती लोक गेले त्याचा आकडा समजेल त्यादृष्टीने वैद्यकीय सुविधा द्याव्या लागतील. त्यासाठी कोकणात जाणाऱया लोकांची संख्या सरकारला माहिती असलीच पाहिजे.

मंत्री व प्रशासनाची बैठक

या बैठकीच्या निमंत्रणाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मंत्री व प्रशासनाची ही बैठक होती. या बैठकीचे कोणालाच निमंत्रण नव्हते. मुंबई व कोकणातील लोकप्रतिनिधी योगायोगाने मुंबईत होते ते स्वतःहून बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, भरत गोगावले, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते इतर आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

  • मुंबईतील चाकरमानी कोकणात कसे जातील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था यावर चर्चा.
  • कोकणात गेल्यावर त्यांना क्वारंटाइन कुठे व कसे करायचे यावर चर्चा झाली.
  • किंबहुना कमीत कमी लोकांनी मुंबईतून कोकणात जावे, असे आवाहन करायचे आहे.
  • कारण दुर्दैवाने कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा सामना करण्यासाठी तेवढी वैद्यकीय सुविधा किती आहे यावरही चर्चा झाली.

किती दिवस क्वारंटाइन?

कोकणात गेल्यावर चाकरमान्यांना किती दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाईल या प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले की, आयसीएमआर व आरोग्य विभागाची मार्गदर्शक तत्त्वे तपासून पाहिली जातील. त्यामध्ये शिथिलता देता येईल का तपासले पाहिजे. या सर्वांची माहिती घेऊन त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या