नगरमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर महापालिका सतर्क

337

नगर शहरामध्ये मंगळवारी करोनाचा रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाने संबंधित रुग्ण ज्या ठिकाणी राहतो, त्याभागात सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये कोणामध्ये सर्दी, ताप, खोकला, अशी लक्षणे आहेत का, याची खात्री केली जात आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी याबाबत माहिती दिली.

करोनाचा काल तिसरा रुग्ण नगर शहरामध्ये आढळल्यानंतर महानगरपालिकेने आता विशेष दखल घेतलेली आहे. संबंधित रुग्ण ज्या भागात आढळलेला आहे, तो कुठे राहतो, याची माहिती प्रशासनाने घेतली असून त्याच्या अवतीभोवती कोणकोण राहत आहे, त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच त्याचे संपर्कात कोणकोण आले आहे, त्याची माहिती प्रशासन घेत आहे. तसेच संबंधित भागात महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या अंतर्गत जवळपास तीन किलोमीटरचा परिसर घेतला जाणार आहे. तसेच सर्वेक्षणाची प्रक्रिया पुढील चौदा दिवस सातत्याने होणार आहे. याकाळात कोणाला सर्दी, खोकला व ताप असे लक्षणे आढळले तर त्याला करोनाची लागण झाली आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधिताला जिल्हा रुग्णालयात सुद्धा दाखल केले जाणार आहे, असेही डॉ.बोरगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी सुद्धा या बाबतचा आढावा बुधवारी घेतलेला आहे. नगर शहरामध्ये सध्या महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये फवारणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता कुठला जर त्रास होत असेल, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच करोना चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आवश्यत ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या