#Coronavirus – हस्तांदोलनासाठी आलेल्या व्यक्तीला शरद पवारांचा लांबूनच नमस्कार

कोरोना व्हायरसचा सामान्या नागरिकांपासून बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांनीच धसका घेतला आहे. संसदेमध्ये खासदार एकमेकांशी हस्तांदोलन करताना आपण पाहिले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्रापासून राज्य सरकारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी मिठी, हस्तांदोलन टाळण्याचा सल्ला प्रशासकीय पातळीतून देण्यात आला आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाबाबत जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही कृती आमलातही आणून दाखवली आहे.

प्राथमिक शिक्षा, कौशल्य विकास, बाल संरक्षण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रथम संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नरिमन पॉईंट येथील वाय. बी.चव्हाण प्रतिष्ठान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रथम संस्थेला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शरद पवारांनी पुरस्कार घेतल्यानंतर हात मिळविण्यासाठी आलेल्या पुरस्कारकर्त्याला, हात न मिळविता दोन वेळा हात जोडून नमस्कार केला. शरद पवारांच्या या कृतीने सभागृहात हशा पिकला, तर पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य दिसलं.

कार्यक्रमादमर्यान शरद पवारांकडून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ‘माझे स्वतःचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागात झाले. स्त्रीने शिक्षणाची आस्था सोसल्यानंतर सर्व घर बदलते. आईने शिक्षणासाठी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवणही पवारांनी यावेळी काढली. तसेच माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम जे.पी.नाईक आणि चित्रा नाईक यांच्यामुळे झाला, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी शिक्षणमंत्री असताना चित्राताई शिक्षण संचालक होत्या, त्या दोघांचे कार्य बघून मी त्यांच्याशी कधीही मंत्री म्हणून वागलो नाही, शिक्षण विभागासाठी त्यांची आस्था मला नेहमीच भावली. त्यामुळे तळागाळापर्यंत शिक्षण पोहचवण्याच्या ध्यासाने काम करत असलेल्या या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.

आपली प्रतिक्रिया द्या