पोहरादेवी येथील गर्दीबाबत तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

वाशीम जिह्यातील पोहरादेवी येथील गर्दीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील ‘मिशन बिगिन अगेन’मध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आढावा बैठकीत बोलताना सांगितले.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले. कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या