जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह; रत्नपुरचे डॉक्टरही संशयीत

461

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी संभाजीनगर शहरात कठोरपणे लाॅकडाऊन केल्यानंतरही गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दोघांचेही नमुणे पॉझीटिव्ह आल्याने त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे संभाजीनगरकर हादरले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णापैकी एक संभाजीनगरातील आरेफ कॉलनी निवासी 21 वर्षीय आयटी अभियंता आहे. तर दुसरा रूग्ण एन 4 मधील 45 वर्षीय महिला आहे.

आरेफ कॉलनी लॉक केली

आरेफ कॉलनी निवासी एक फार्मासिस्ट हा 15 मार्च रोजी पुण्याहून संभाजीनगर येथे परतला होता. 20 मार्च रोजी त्याला सर्दी, खोकला व ताप आदि त्रास जाणवू लागला. साधारण सर्दी पडसे समजून त्याने खासगी रूग्णालयात उपचार घेतले. परंतु, त्रास कमी होत नसल्याने त्याला ३१ मार्च सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्याच्या लाळेचे नमुणे घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असता त्याचा आज पॉझीटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. यानंतर त्याच्या संपर्कातील त्याचे आई वडिल, पत्नी व दोन मुलांचे लाळेचे नमुणे घेण्यात येऊन तेही पुण्याला पाठवण्यात आले. परिवारातील या पाचही जणांना आयसोलेटेड करण्यात आले आहे. आरेफ कॉलनी परिसर संपूर्णपणे सिल करण्यात आला असून आरेफ कॉलनीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त तसेच महसुल, आरोग्य व पोलीस खात्याचे कर्मचारी आरेफ कॉलनीत पोहोचले आहेत.

एन 4 मधील महिला पॉझीटिव्ह

कोरोना पॉझीटिव्ह रिपोर्ट आलेल्या सिडको एन 4 मधील महिला रूग्णाचा पती 7 मार्च रोजी काही कामानिमित्त दिल्ली, मनाली, आग्रा, चंडिगड आदि शहरात फिरून 15 मार्च रोजी संभाजीनगरात परतला. 23 मार्चपासून पती पत्नीला सर्दी पडश्याचा व तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी रूग्णालयात न्युमोनियाचा इलाज सुरू केला. परंतु, त्रास बळावतच गेल्याने शेवटी दोघेही ३१ मार्च रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे त्यांच्या लाळेचे नमुणे घेण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील पाचही सदस्यांचे व त्यांच्यावर उपचार करणाNया पाच खासगी डॉक्टर, एक परिचारिका व एक टेक्नेशियन यांचेही लाळेचे नमुणे घेऊन हे सर्व नमुणे पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यापैकी महिलेच्या लाळेच्या नमुण्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला. पती व अन्य सदस्यांचे व डॉक्टर वगैरेंचे अहवाल येणे बाकी आहेत.

रत्नपूरचा डॉक्टर संशयीत

रत्नपूर शहरातील मूळचा निवासी असलेला एक डॉक्टर मुंबईत खासगी रूग्णालयात कार्यरत होता. रूग्णालयात दाखल असलेल्या काही कोरोना बाधीत रूग्णांवर त्याने उपचार केला. परंतु, यातील एक कोरोनाबाधीत रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर या डॉक्टरचीही प्रकृती बिघडली, त्यालाही कोरोना सदृष्य लक्षणे दिसू लागल्याने तो तातडीने रात्री अडिच तीन वाजेच्या दरम्यान रत्नपूरला परतला. शुलीभंजन येथे तो व त्याचे कुटुंब रहाते. मात्र आलमगीर पार्क या इमारतीत तो एकटाच राहू लागला. सकाळी त्याचे वडिल त्याला भेटायला आले ते त्याला दुरूनच चहापाणी देऊ लागले हे पाहून शेजारी पाजारी घाबरले. शेवटी त्याला संभाजीनगर येथे चिकलठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याच्या लाळेचे नमुणे घेण्यात आले. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या