रुग्णवाहिकेतून ‘त्या’ करोनाबाधीत प्रवासी महिलेची वाहतूक करणाऱ्या मालक आणि चालकांवर गुन्हा दाखल

1003
crime

लाॅकडाऊनच्या काळात अवैद्यरित्या रुग्णवाहिकेतून ‘त्या’ करोना बाधीत महिलेची प्रवासी वाहतूक केल्याबद्दल वाहन मालक सचिन लाड व चालक मिलिंद रेळेकर या दोघांवर मंगळवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक अरविंद कुंभार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

कसबा बावडा येथील मराठा काॅलनीतील एका 63 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ही महिला सातारा येथून संचारबंदीच्या काळात एका रुग्णवाहिकेतून कोल्हापूरात दाखल झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना दि.28 मार्च रोजी नोंदणीकृत रुग्णवाहिका मधून कोणतीही परवानगी न घेता अवैद्यरित्या सातारा ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक झाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार किणी टोल नाका येथील सीसीटीव्ही कॕमेरे काल दि.6 एप्रिल रोजी तपासले असता,यामध्ये दि.28 मार्च रोजी दुपारी 3 वाजून 4 मिनिटे 1 सेंकद वाजता ही रुग्णवाहिका कोल्हापूरकडे येत असताना दिसून आली. या रुग्णवाहिकेतूनच प्रवास करणाऱ्या येथील ‘ त्या ‘ महिला प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.तर पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेत हि रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे जाताना आढळली.  मलकापूर,ता.शाहूवाडी येथे पोलिसांनी संबंधित  रुग्णवाहिका आणि चालकास काल ताब्यात घेतले.आज या रुग्णवाहिकेचे मालक सचिन लाड आणि चालक मिलिंद रेळेकर या दोघांविरुद्ध भा दं वि सं कलम 269, 270, 271 व 188 साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या