गावठी दारूच्या भट्ट्या उद्धस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सटाणा
जायखेडा पोलिसांनी दारूबंदी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. रसायन आणि दारूचे जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी बॅरेल कचराकुंडय़ा म्हणून वापरण्यासाठी नागरिकांना मोफत वाटण्याचा अभिनव उपक्रम जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला तळीरामांना धडा शिकविण्यासाठी तसेच अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री अड्डय़ांवर जायखेडा पोलिसांनी पहाटेपासून धडक कारवाई करत छापेमारी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी ठिकठिकाणी दारू भट्टी अड्डय़ांवर तसेच विक्री केंद्रावर छापा टाकून रसायन आणि दारूचे बॅरेल जप्त केले आहेत.

सवेल, तेलदरा, वाघंबा, आसखेडा व तांदूळवाडी येथे ही छापेमारी करण्यात आली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी दिली. सुमारे पाचशे लिटरहून अधिक गावठी दारू व रसायन नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाऊण लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. या गुह्यांमध्ये अशोक माळी (रा.दसवेल), जिजाबाई सोनवणे (रा.तेलदरा), वाधू सूर्यवंशी (रा.वाघंबा), तुळशीराम महाले (रा.वाघंबा) या चौघांना अटक केली असून उर्वरित फरारी आरोपींचा शोध घेतला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम कोळी, पोलीस हवालदार अंबादास थैल, देविदास माळी, राजू गायकवाड, दशरथ गायकवाड, निंबा खैरनार, राजेंद्र सावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.