
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रेमीयुगुलाने कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील एका धर्मशाळेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जुना राजवाडा पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. राहुल विश्वास मच्छे (वय 25) आणि प्रियंका विकास भराडे (वय 22, दोघे रा. तामसवाडी, ता. नेवासा, जि. नगर) अशी मृतांची नावे आहेत.
राहुल व प्रियंका हे एकाच गावचे रहिवासी असून, प्रियंकाचे तीन वर्षांपूर्वी गावातीलच एकाशी लग्न झाले आहे. पण प्रेमसंबंध असल्याने राहुल आणि प्रियांका 31 डिसेंबर 2021 रोजी येथील ताराबाई रोडवरील धर्मशाळेत उतरले होते. शुक्रवारी सायंकाळपासून त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद असल्याने धर्मशाळेच्या मालकांना संशय आला. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून काढला. यावेळी दोघांनी फॅनच्या हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
एकत्र जगू शकत नसालो, तरी मरू शकतो!
आत्महत्येपूर्वी प्रियंकाने , ‘आम्ही प्रेम करतो, पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो, तरी मरू मात्र शकतो’, अशी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली.


























































