बदलापूरमधील मिंधे गटाचे नेते आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. वामन म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बदलापूरमध्ये महिला पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. तेव्हा एका वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराला म्हात्रे यांनी शिवीगाळ केली. अशा बातम्या देतेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा शब्दांत म्हात्रे यांनी या महिला पत्रकाराला सुनावले होते. त्यानंतर या महिलेने पोलिसांत म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याबद्दल मिंधे गटाचे नेते वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी म्हात्रे यांनी कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर कल्याण कोर्टाने निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी कल्याण कोर्टाला याबाबत वेळीच निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे. पण वामन म्हात्रे यांना तातडीची दिलासा देण्यास नकार दिला. वामन म्हात्रे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला. सुनावेळी सरकारी वकिलांनी म्हात्रे यांच्यावर तूर्तास कोणतीही कारवाई करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले.