कोर्टात हजर झालेल्या नितेश राणेंचा रडीचा डाव! खटल्याची सुनावणी अन्य दंडाधिकाऱ्यांसमोर घ्या, वकिलांची माझगाव न्यायालयाला विनवणी

प्रसारमाध्यमांसमोर बेताल बडबड केल्याप्रकरणी गोत्यात आलेले भाजप मंत्री नितेश राणे न्यायालयाच्या दणक्यानंतर आज प्रथमच माझगाव कोर्टात हजर झाले. कोर्टाची वारी राणेंच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी थेट या खटल्याची सुनावणी अन्य दंडाधिकाऱयांकडे वर्ग करण्याची विनवणी कोर्टाला केली. त्यावर सत्र न्यायालयाचा तसा आदेश पुढील सुनावणीला सादर करा असे सांगत दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी या खटल्यावरील सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केली होती. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूपंप होणार… खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे निराधार दावे करीत नितेश राणे सैरभर बरळले होते. याप्रकरणी खासदार राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावर आज मंगळवारी दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

कोणत्याही न्यायाधीशांसमोर सुनावणी घ्या

खासदार संजय राऊत यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद करताना राणेंच्या वकिलांच्या विनंतीनंतर आपली बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की देशातील कोणत्याही न्यायाधीशांसमोर या खटल्यावर सुनावणी घ्या, आमची हरकत नाही, मात्र खटला वेळेत निकाली काढा, असेही ते म्हणाले.