कोरोनाने पुन्हा डोके वर काढले; वाढवली चिंता, WHO च्या अहवालात धक्कादायक माहिती

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. अमेरिकेपासून कोरियापर्यंत जगभरातून अनेक भागात कोविडच्या केसेस समोर येऊ लागल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘WHO’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून उघड झाली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या अंदाजानुसार अमेरिकेतील 25 राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. त्यामुळे जगभरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये चार हजारांहून अधिक कोविड संक्रमित दाखल झाले आहेत. तर दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. 24 जूनपासून 21 जुलैपर्यंत 85 देशांमध्ये दर आठवड्याला कोरोनाच्या जवळपास 17 हजार 358 चाचण्या करण्यात आल्या.

हिंदुस्थानात काय परिस्थिती?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, हिंदुस्थानात जूनपासून जुलैपर्यंत कोरोनाची 908 प्रकरणे समोर आली. यात दोघांचा मृत्यू झाला. आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानची परिस्थिती अन्य देशांप्रमाणे गंभीर नाही, मात्र सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोना पुन्हा एकदा येतोय आणि त्याने चिंताही वाढल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. जगात या विषाणूने जवळपास 26 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 11 टक्के कोरोनाच्या प्रकरणात वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.