कोविड संदर्भात राज्यात 1 लाख 97 हजार गुन्हे दाखल -गृहमंत्री अनिल देशमुख

522

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 97 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे 22 मार्च ते 20 जुलै या कालावधीत कलम 188 नुसार 1,97,541 गुन्हे नोंद झाले असून 31,332 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी 6 लाख 19 हजार 794 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 315 घटना घडल्या. त्यात 881 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबरवर 1 लाख 7 हजार फोन
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,07,842 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा 805 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1346 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 47 पोलीस व 4 अधिकारी अशा एकूण 51, ठाणे शहर 7 व ठाणे ग्रामीण 2 व 1 अधिकारी, रायगड 2, पुणे शहर 3, नाशिक शहर 1, सोलापूर शहर 3, अमरावती शहर 1 wpc, मुंबई रेल्वे 4, नाशिक ग्रामीण 3, जळगाव ग्रामीण 1, जालना SRPF 1 अधिकारी, नवी मुंबई SRPF 1, पालघर 2, ए.टी.एस. 1, उस्मानाबाद 1, औरंगाबाद शहर 1, जालना ग्रामीण 1, नवी मुंबई 1, अशा 88 पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या 199 पोलीस अधिकारी व 1410 पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल डिस्टन्सिंग पाळा
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या