शिमगोत्सवावरील कोरोनाचे ढग गडद, ग्रामस्थांच्या आनंदावर विरजण

कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक असलेला शिमगोत्सव तोंडावर आला असतानाच शिमगोत्सवावरील कोरोनाचे ढग गडद होऊ लागले असल्याने शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गतवर्षी कोरोनच्या सावटाखालीच शिमगोत्सव साजरा करावा लागला होता. यावर्षीही शिमगोत्सवाचे ढोल वाजायला लागले असतानाच कोरोनाचे वादळ पुन्हा घोंगावू लागल्याने यंदा ही शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यावर निर्बंध येणार असल्याने शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झालेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

शिमगोत्सव हा ग्रामदेवतेच्या सण असल्याने या सणाशी प्रत्येकाच्या धार्मिक भावना निगडित असतात. त्यामुळे शिमगोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आपल्या मूळ गावी येतात. ग्रामदेवतेचे दर्शन घेणे, ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचविणे यामध्ये प्रत्येकाला एक वेगळा आनंद मिळत असतो. ग्रामदेवतेची खणा-नारळाने ओटी भरणे सुहासिनींसाठी एक पर्वणीच असते. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षापासून शिमगोत्सवाचा हा आनंद काहीसा हिरावला गेल्यासारखे झाले आहे.

गेल्या वर्षीचा शिमगोत्सवही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा करावा लागला होता. त्यामुळे शिमगोत्सवाच्या रूढी आणि परंपरा पाळण्यात मर्यादा आल्या होत्या. या वर्षी तरी गेल्या वर्षाची कसर भरून काढला येईल अशी अपेक्षा होती. मात्र शिमगोत्सवाचे ढोल वाजायला सुरवात होणार इतक्यात हद्दपार होण्याच्या वाटेवर असलेल्या कोरोनाने पुन्हा आपले बसताना बसवायला सुरवात केल्याने यावर्षी देखील गतवर्षाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक खबरदारी घेत शिमगा सण साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गावी जावे की ना जावे हा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे.

गेल्या महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बऱ्यापैकी आटोक्यात आला होता. कधी कधी तर पूर्ण जिल्ह्यात एक किंवा दोन रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनमुक्तीकडे होत असल्याचे चित्र होते. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी ज्या तालुक्यात गेला तो खेड तालुका तर जवळजवळ कोरोनमुक्त झाला होता. मात्र 9 फेब्रुवारीचा दिवस उजाडला आणि खेड तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. तालुक्यातील वरवली या गावी ९ तारखेला पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर या गावात कोरोनाबाधितांची रांगच लागली. गेल्या 12 दिवसात या गावात 64 तर तालुक्यात ७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शिमगोत्सव साजरा करायचा तर तो कसा? हा प्रश्न प्रशासनासह ग्रामस्थांना भेडसावू लागला आहे.

वाऱ्याच्या वेगाने पसरण्याचा कोरोनाला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी शिमगोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षी शिमगोत्सवाचा आनंद लुटता येणे शक्य नाही. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. साहजिकच शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झालेल्या ग्रामस्थांचा कोरोनाने चांगलाच हिरमोड केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या