कोविड-19 प्रॉडक्ट आयडियाथॉन स्पर्धेमध्ये राजेंद्र माने अभियांत्रिकीच्या प्रतिक महाडिकचे यश

393

नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या ‘कोविड -19 प्रॉडक्ट आयडियाथॉन’ या स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिक महाडिक याने पदवी व पदव्युत्तर गटात विजेतेपद पटकाविले आहे.

सध्या संपूर्ण जग कोविड-19 महामारीच्या संकटाने त्रस्त आहे. यामध्ये वापरण्यात येणारी अनेक प्रचलित उत्पादने व उपचार पद्धती तितक्याशा उपयोगी ठरताना दिसत नाहीत. त्यामुळे या संकटातील अडचणींवर मात करता येईल अशा आयडिया व त्याआधारित उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी विविध गटातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये वरील गटात महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी प्रतिक महाडिक याने सादर केलेल्या रोबो कार्टला प्रथम क्रमांक देण्यात आला.

ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे 30 मीटरपर्यंत आणि जवळपास 50 किलो पर्यंतच्या वजनाची सामग्रीची ने आण करणे शक्य होते. रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या या कार्टचा रुग्णांना अन्न व औषधी देण्याचे काम करताना प्रत्यक्ष वापर करता येऊ शकेल व त्यायोगे आरोग्य कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षितता मिळते.

फिनोलेक्स अकॅडेमी रत्नागिरी तर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रतिक महाडिक यास प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्रा. इसाक शिकलगार यांचे याकामी त्याला मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री रवींद्रजी माने, कार्याध्यक्षा नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या