गुड न्यूज! महिनाभरात प्रथमच नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त

राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असून 15 जिह्यांमध्ये हे चित्र पाहायला मिळत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेगही वाढविण्यात येत असून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी 18 लाख डोसच्या खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डचे 9 लोख डोस मिळाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरण तसेच रुग्णसंख्येबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात 45 वर्षांवरील सुमारे 1 कोटी 65 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ 25 हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते. आज राज्याला 9 लाख डोस मिळाले आहेत. त्यातून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. 45 वर्षांवरील सुमारे 3.5 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.

18 ते 44 मधील 1 लाख लोकांचे लसीकरण

1 मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास सुरुवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे 1 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे 13 लाख 58 हजार तर कोवॅक्सिन लसीच्या 4 लाख 89 हजार असे एकूण 18 लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तरुणांनी लसीकरणासाठी गर्दी करू नये.पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

150 ऑक्सिजन प्लांटसाठी कार्यादेश

राज्यात जिल्हाधिकाऱयांमार्फत 150 ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाकडून राज्याला जे 10 पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील 9 प्रकल्पाचे काम पूर्ण.
सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज 40 हजाराच्या आसपास रेमडेसिवीर मिळत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसिवीर जिह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱयांना वाटप केले जात आहेत.

स्पुटनिकचा दर ठरल्यानंतर डोस मागवणार

स्पुटनिक लस देशात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील. राज्य शासनाने रेमडेसिवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, 20 हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, 27 स्टोरेज टँक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, रायगड, धाराशिव, चंद्रपूर आणि गोंदीया या जिह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोल्हापूरसह सांगली, साताऱयात आजपासून कडक लॉकडाऊन

वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी कोल्हापूरसह सांगली, साताऱयात उद्या बुधवारपासून कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. कोल्हापूर दहा दिवस, सांगलीत आठ तर सातारामध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन असेल.

आपली प्रतिक्रिया द्या