कोरोना लढ्याचे यशस्वी ‘मुंबई मॉडेल’ जगासाठी आदर्श! मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार, कोरोना योद्ध्यांना सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचंड गर्दी आणि दाटीवाटीच्या मुंबईत पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ‘कोरोना योद्ध्यां’नी स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र केलेल्या मेहनतीमुळे ‘कोरोना लढ्या’त आपण यशस्वी झालो. या लढ्यात आपण अनेकांना गमावले, तर लाखो जणांनी कोरोनावर मात केली. या सर्वांना माझा सलाम असल्याचे सांगत कोरोना रोखण्याच्या ‘मुंबई मॉडेल’ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल-कोविड वॉरियर’ पुस्तक जगासाठी आदर्श ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज काढले.

मार्च 2020 पासूनच्या दोन वर्षांच्या कोरोना लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच जोमाने काम केले. या काळात पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना करून कोरोना पूर्ण नियंत्रणात आणला. या ‘मुंबई मॉडेल’ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आली आहे. ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर आयोजित सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता, पुस्तकाचे लेखक मिनाझ मर्चंट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना, आयुक्त चहल म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार कोविड उपाययोजनांचे विविध 29 मॉडेल्स तयार केले. यामुळेच आपण कोरोना लढ्यात यशस्वी होऊ शकलो!

… आणि दीडशे रुग्णांचे प्राण वाचले!

कोविड काळ हा कसोटीचा होता. सुरुवातीच्या दोन्ही लाटांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. एका रात्रीच्या वेळी तर 150 रुग्णांसाठी ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि प्रशासनाच्या यशस्वी नियोजनामुळे दीडशे रुग्णांचे यशस्वीरीत्या स्थलांतर केल्याने त्यांचे प्राण वाचल्याची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.

…म्हणूनच ही यशोगाथा

रुग्णसंख्या दिवसाला हजारोंनी वाढत असताना वेगाने रुग्णालये, बेड, रुग्णवाहिकांचे नियोजन केले. केवळ 15 दिवसांत बीकेसी येथे जम्बो कोविड सेंटर सुरू केले. कोरोना लढा हे सांघिक काम होते. अधिकारी-कर्मचाऱयांवर विश्वास टाकून त्यांच्यात हिंमत जागवली. कॅप्टन म्हणून या सर्वांमध्ये आत्मविश्वास जागवल्याने या सर्वांनी हे अतिशय अवघड काम निभावले. बोलणे आणि कृती यामधील अंतर कमी केले म्हणूनच आपण कोरोना लढ्याची यशोगाथा पुस्तकाद्वारे मांडू शकलो, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. कोविडच्या काळात केलेल्या उपाययोजनांचे संकलन होणे आवश्यक होते. त्या सर्व गोष्टींची माहिती या पुस्तकात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

माहिती मार्गदर्शक ठरेल – आदित्य ठाकरे

आशियातील सर्वात मोठ्या आणि प्रचंड दाटीवाटीच्या धारावीतही कोरोना नियंत्रणात आणल्यामुळे जगात कौतुक झाले. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दुसऱया दिवसापासून फील्डवर काम सुरू केले. त्यामुळे कर्मचारी-अधिकाऱयांनाही हिमतीने संकटावर मात करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. या पुस्तकाचा अनुवाद इतर भाषांमधून होईल आणि त्याचा इतरांनाही या माहितीचा उपयोग होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.