WHO म्हणतं कोरोनाचा शेवट इतक्यात नाही, नियमांचं आणखी कठोरपणे पालन व्हावं!

जागतिक आरोग्य संघटनेचे ( WHO ) अध्यक्ष टेड्रोस अदानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी नवा दावा केला आहे. ते म्हणाले की जगभरात आतापर्यंत 78 कोटीहून अधिक लोकांना कोविड-19 विरोधी लसी टोचल्या गेल्या असल्या तरी कोरोना साथरोगाचा शेवट अजून दूर आहे. जन आरोग्यासंदर्भात कडक पावलं उचलून त्यावर नियंत्रण मिळवता येतं. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नियम आणखी कडक केल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येईल. चीनच्या वुहान शहरात डिसेंबर 2019 मध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाचा (Coronavirus Infection) पहिला रुग्ण आढळला होता. आतापर्यंत जगभरात 13,65, 00,400 लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे. या आजाराने 29,44,500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

WHO च्या अध्यक्षांनी म्हटलं आहे की, जगभरात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सहा आठवड्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र आता सलग सात आठवडे संख्येत वाढ दिसत असून जगभरात अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. गंभीर बाब म्हणजे पुन्हा एकदा मृत्यूदर वाढीस लागला असून गेल्या आठवड्यात मृत्यूदर सर्वाधिक असल्याचं समोर आल्याचं ते म्हणाले. आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचं दिसत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. गेब्रेयसस यांनी जिनिवा मध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जगभरातील लसीकरण अभियानाची माहिती दिली आहे. लसीकरण हे कोरोनाला रोखण्यासाठी एक प्रभावशाली शस्त्र आहे, मात्र हाच एकमेव उपाय आहे असं मानणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी सागंतिलं.

त्यांनी पुन्हा एकदा जुन्याच नियमांच्या पालनावर जोर दिला आणि आणखी कडक नियमांचं पालन आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ‘सोशिअल डिस्टंस, मास्कचा योग्य वापर, योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे. देखरेख, चाचण्या, संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या, विलगिकरण हे या आजाराला रोखण्याचे, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे आणि जीव वाचवण्याचे प्रभावी उपाय आहेत.’ WHO च्या अध्यक्षांना बोलताना हे नमूद केलं की कोरोनाचा शेवट अजून दूर आहे. मात्र असं असलं तरी आशादायी चित्र निर्माण होण्याचीही चिन्हं दिसू लागल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले की, काही देशांनी कठोर नियम लादून कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. त्या देशातील लोक आता देशांतर्ग मुक्तपणे फिरू लागले आहेत, क्रीडा आणि अन्य स्पर्धांचं आयोजन करताहेत, रेस्टॉरंट-हॉटेल्स पर्यटन स्थळांना कुटुंबासोबत भेट देताहेत… WHO लाही कायम लॉकडाउन नको आहे. मात्र नियमांचं कठोरपणे पालन आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘जगभरात कायम लॉकडाउन रहावं अशी आमचीही इच्छा नाही. आम्हालाही वाटतं की सामाजिक गोष्टींना पुन्हा सुरुवात व्हावी, अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसावी आणि प्रवास-व्यापार वैगरे पुन्हा सुरळीत व्हावेत. आम्हाला देखील तेच चित्र बघायचं आहे. मात्र सध्या काही देशांमधील स्थिती ही भीतीदायक आहे. रुग्णालयं ओसंडून वाहत आहे, आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे, मृत्यूदर पुन्हा वाढला आहे आणि विशेष म्हणजे पूर्णपणे टाळता येण्यासारखं आहे. त्यासाठी आताच कठोरपणे नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जे नियम आधी घालून दिले होते ते अत्यंत कठोरपणे पाळले गेले पाहिजे. तसे नियम पाळल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येतं.

आपली प्रतिक्रिया द्या