विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करा! उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. विद्यापीठातील विविध अडचणींसंदर्भात कलीना पॅम्पसमध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उदय सामंत यांनी विद्यापीठातील नवीन ग्रंथालय इमारत, परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या इमारतींच्या कामकाजाबाबत आढावा घेत.

मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले असून विद्यापीठाची गुणवत्तेत वाढ करून विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱया पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकार सहकार्य करेल. मुंबई विद्यापीठ, मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए यांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे. त्यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अजित बाविस्कर, मुंबई विभागाचे सहसंचालक सोनाली रोडे, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक आदी उपस्थित होते. पंत्राटी कामगारांना नियमाप्रमाणे वेतन वेळेवर दिले पाहिजे. अनेक कामगारांना वेतन नियमानुसार मिळत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे येत असून त्यावर विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करावी आणि कामगारांना वेतन द्यावे, असे निर्देशही यावेळी सामंत यांनी दिले. तसेच एमएमआरडीएला विद्यापीठाचा बृहतआराखडा लवकर सादर करण्याच्या सूचनाही केल्या. मुंबई विद्यापीठात लवकरच जनता दरबारचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, विविध प्राध्यापक संघटना यांच्या तक्रारी, पेन्शन विषय, प्रलंबित मेडिकल बिल, अनुपंपा भरती याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सामंत म्हणाले.

नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतरित करा

मुंबई विद्यापीठातील ग्रंथसंपदेची झालेली हेळसांड युवासेनेमुळे उघडकीस आली. या प्रकरणाची उदय सामंत यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने नवीन ग्रंथालयामध्ये ग्रंथसंपदा स्थलांतर करावी यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने संबंधितांनी द्याव्यात, असे निर्देश सामंत यांनी दिले. तसेच या इमारतीमध्ये विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. येथे काही दुर्घटना होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

विद्यापीठाच्या नवीन इमारतींचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई विद्यापीठाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रंथालय, परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या इमारतींचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत लवकरच उद्घाटन करण्याचा निर्णय उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.