ऑस्ट्रेलियाच्या उत्तरावरून स्पष्ट झालं हिंदुस्थानचं महत्त्व, टीम इंडियाची कॉलर टाईट

चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा जगभरात धुमाकूळ सुरू आहे. मोठमोठ्या देशांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. अनेक देश लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा देखील पुढे ढकलल्या आहेत. हिंदुस्थान देखील याच स्थितीतून जात आहे. मात्र तरी देखील जगाच्या आशा हिंदुस्थानवर टिकून आहेत हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या उत्तरावरून सिद्ध होत आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जवळ आला आहे. वर्षा अखेरीस दोन्ही संघात 4 कसोटी सामन्यांची एक मालिका खेळवली जाणार असे ठरले होते. मात्र जगभरातील स्थिती लक्षात घेता या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट आहे. या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट यांना विचारणा झाली. त्यावर 90 टक्के ही मालिका खेळवली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियावर सध्या मोठं आर्थिक संकट आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही मालिका होणे आवश्यक आहे. कारण या एकट्या मालिकेच्या प्रसारणाच्या हक्काद्वारे 30 कोटी डॉलर मिळतील. कोरोना विषाणू प्रसारामुळे आर्थिक संकट दाट झाले असून जूनपर्यंत ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ 20 टक्केच पगार देणार आहेत. आता काहीच सांगता येत नाही. टीम इंडियाच्या दौऱ्यासाठी 10 पैकी 10 अशी शक्यता मी देऊ शकत नाही. मात्र 10 पैकी 9 टक्के अशी आशा मी करतो, असे रॉबर्ट म्हणाले. टीम इंडियाचा दौरा न झाल्यास मात्र आश्चर्य वाटेल , असंही ते म्हणाले. तसेच दौरा निश्चित झाल्यास प्रेक्षक पहिल्या सामन्यापासून असतील असे वाटत नाही, कदाचित पुढली परिस्थिती लक्षात घेऊन बदल करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडच्या दौऱ्यावर जावे लागणार आहे. पण त्याआधी वेस्ट इंडिज, पाकिस्तान यांचा इंग्लंड दौरा आहे. यामध्ये कशी काळजी घेतली जाते, हे पाहून पुढला निर्णय घेतला जाईल. पण आमच्या संघाच्या सुरक्षिततेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशी आशा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यंदा ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होण्याची शक्यता कमी असून तो 2021 मध्ये भरवला जाईल असे वाटते. तर 2022 मध्ये टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानात होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या