क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआयचे आभार, पत्राद्वारे व्यक्त केली भावना

कोरोनाचा काळ… क्वारंटाइनचा कालावधी… तरीही टी-20, वन डे व कसोटी मालिका यशस्वी संपन्न… हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या मालिकेची ही स्टोरी. या दौऱ्यात हिंदुस्थानने टी-20 व कसोटी आणि ऑस्ट्रेलियाने वन डे मालिका जिंकली. दोन देशांमधील मालिका यशस्वी पार पडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पत्र लिहून बीसीसीआयचे आभार मानले.

कोरोनामुळे हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार की नाही याबाबत चर्चा रंगू लागल्या. पण आयपीएलच्या यशस्वी आयोजनानंतर हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियात मालिका खेळायला आला. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी कोरोनासंबंधित नियमांचे पालन केले. टी-20, वन डे व कसोटी मालिका व्यवस्थितरीत्या पार पडली. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींचेही मनोरंजन झाले, अशा शब्दांत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बीसीसीआयचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. या पत्रात पुढे म्हटले की, हिंदुस्थानी संघासमोर कसोटी मालिकेत नवी आव्हाने उभी राहिली, पण न डगमगता त्यांनी बॉर्डर-गावसकर करंडक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. आमचा जवळचा मित्र असलेल्या बीसीसीआयने हा दौरा यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

आपली प्रतिक्रिया द्या