100 रुपयांत वानखेडेवर मुंबई लीगचा थरार, क्रिकेटप्रेमींसाठी एमसीएची अनोखी भेट

ज्यांना आयपीएलचा थरार वानखेडेवर अनुभवता आला नाही, त्या क्रिकेटप्रेमींसाठी टी-20 मुंबई लीगचा (एमपीएल)थरार अवघ्या 100 रुपयांत अनुभवता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने आपल्या बहुप्रतीक्षित लीगच्या तिकीटविक्रीची घोषणा केली असून मुंबईच्या अस्सल क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा याची देही याची डोळा टी-20 फटकेबाजी अनुभवता यावी म्हणून तिकीटदर 100 रुपये ठेवण्यात आल्याची माहिती एमसीए अध्यक्ष अजिंक्य रहाणे यांनी दिली.येत्या 4 ते 12 जून दरम्यान ही लीग वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळविली जाणार असून या सामन्यांची तिकीटे डिस्ट्रिक बाय झोमॅटोवर उपलब्ध करण्यात आली आहेत.

आयपीएलचा थरार संपताच मुंबई लीगची फटकेबाजी सुरू होणार आहे. या फटकेबाजीचा मनमुराद आनंद क्रिकेटप्रेमींना अवघ्या 100 ते 400 रुपयांच्या तिकीटदरात लुटता येणार आहे. सामान्य क्रिकेटप्रेमींना परवडतील इतके दर कमी दर ठेवल्यामुळे मुंबईकर मोठय़ा संख्येन वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर गर्दी करतील, असा विश्वास एमसीएने व्यक्त केलाय. या लीगमध्ये हिंदुस्थानच्या टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि पृथ्वी शॉ या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची षटकारबाजी क्रिकेटप्रेमींना पाहण्याची संधी मिळणार आहे. या तिसऱ्या मोसमात  मुशीर खान आणि अंगकृष रघुवंशी यांसारखे मुंबईतील उदयोन्मुख स्टार्सदेखील सहभागी होणार आहेत. एमसीएने पालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी आणि वंचित मुलांना हे सामने पाहण्याची विनामूल्य सोय केली आहे. या संधीचा शाळकरी विद्यार्थ्यांनी नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.