हिंदुस्थानचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी महान अष्टपैलू खेळाडू बापू ऊर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व एक नातवंड असे कुटुंब आहे. बापू नाडकर्णी यांच्या निधनानंतर मुंबईच नव्हे तर क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे.

बापू नाडकर्णी गेली काही वर्षे आपल्या मुलीकडे मुंबईतील पवई येथे राहत होते. मागील चार ते पाच दिवसांमध्ये त्यांची तब्येत खालावली. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या (शनिवारी) दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बापू नाडकर्णी यांचा क्रिकेटमध्ये प्रवेश झाला तो 1950-51 साली. रोहिंटन बारिया ट्रॉफीमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाराष्ट्रासाठी खेळण्याची संधी त्यांना मिळाली. दोन वर्षांनंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी खेळताना मुंबईविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये तीन तासांमध्येच नाबाद 103 धावांची खेळी साकारली. एवढेच नव्हे तर सदाशिव पाटील यांच्यासोबत त्यांनी अखेरच्या विकेटसाठी 103 धावांची दमदार भागीदारीही रचली.

पदार्पणात अर्धशतक

बापू नाडकर्णी यांचे कसोटी पदार्पण 1955-56 साली झाले. विनू मांकड यांनी विश्रांती घेतल्यामुळे त्यांना नवी दिल्ली येथील फिरोजशहा कोटला ग्राऊंडवर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले. या कसोटीत त्यांनी नाबाद 68 धावांची खेळी साकारली, मात्र या कसोटीत 57 षटके गोलंदाजी केल्यानंतरही त्यांना एकही फलंदाज बाद करता आला नाही.

गोलंदाजीत अचूकता

बापू नाडकर्णी अचूक टप्प्यातील गोलंदाजीसाठी ओळखले जायचे. षटकात दोनपेक्षा कमी धावा ही त्यांची कारकीर्दीतील गोलंदाजी सरासरी होती. यावरूनच त्यांची गोलंदाजीतील अचूकता कळून येते. एकाच टप्प्यात सातत्याने चेंडू टाकण्यात त्यांची हातोटी होती.

बापू नाडकर्णी यांनी 41 कसोटींमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये त्यांनी एक शतक व सात अर्धशतकांसह 1414 धावा फटकावल्या. कसोटीत नाबाद 122 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. 290.7 च्या सरासरीने त्यांनी 88 फलंदाजही बाद केले. एका डावात त्यांनी चार वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त फलंदाज बाद केले. तसेच कसोटीत दहा बळी त्यांनी एक वेळा टिपले.

सलग 21 षटके निर्धाव

हिंदुस्थान – इंग्लंडमधील यांच्यामध्ये 1963-64 सालामध्ये झालेल्या मालिकेतील चेन्नई येथील सामन्यात बापू नाडकर्णी यांनी विक्रम नोंदवला. त्यांनी सलग 21 षटके निर्धाव टाकली. तसेच त्यांनी टाकलेल्या 131 चेंडूंवर एकही धाव घेतली गेली नाही. त्यांचा एका डावातील स्पेल होता 32 षटके, 27 निर्धाव, अवघ्या पाच धावा आणि शून्य विकेट.

शांत स्वभावाचे – चंद्रकांत पंडित

बापू नाडकर्णी यांच्यासोबत एकत्र काम करण्याचे भाग्य मला लाभले. मी त्यांच्यासोबत एसीसीमध्ये काम करीत होतो. त्यांच्या अचूक टप्प्यातील गोलंदाजीबाबत खूप काही ऐकले होते. त्यांच्यासोबत काम करताना त्यांचा शांत स्वभावही समजला. आमच्या क्रिकेटवरील गप्पा रंगायच्या. ते उत्तम मार्गदर्शकही होते, असे चंद्रकांत पंडित यावेळी म्हणाले.

माझे व्यवस्थापक अन् कोच -दिलीप वेंगसरकर

मी टाटासाठी खेळत असताना बापू नाडकर्णी यांनी एसीसीचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र माझ्यासाठी ते नेहमी व्यवस्थापक व कोच म्हणून कायम राहतील. ते खूप मोठे होते. मी पहिले शतक झळकावले तेव्हा ते हिंदुस्थानचे व्यवस्थापक होते. त्यानंतर ते संघाचे कोचही झाले, असे दिलीप वेंगसरकर यावेळी आवर्जून म्हणाले

एक युग संपले! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

हिंदुस्थानी क्रिकेटचे एक युग संपले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बापू नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली. बापू नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल तीक्र दुःख व्यक्त करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले अचूक मारा करणारा गोलंदाज अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटचे स्नेही होते. अनेकदा ते ’मातोश्री’ वर येत. गप्पाची मैफल जमत असे. बाळासाहेबांन बरोबर रेल्वे प्रवास करणारी जी टीम होती त्यात बापू होते. देश बापूंच्या दिलदार खेळीचे सदैव स्मरण ठेवेल. बापूंना माझा मानाचा मुजरा !

आपली प्रतिक्रिया द्या