वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जून महिन्यातच होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे काही क्रिकेट मालिका अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या तारखांमध्ये बदल करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा नियोजित वेळेप्रमाणेच पुढल्या वर्षी जून महिन्यात होईल असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनामुळे काही मालिका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील गुणांकन क्लिष्ट होऊन बसले आहे. यावर सविस्तर चर्चा करून आयसीसीकडून तोडगा काढण्यात येणार आहे. आगामी काळात चित्र स्पष्ट होईल, असे आयसीसीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

हिंदुस्थान पहिल्या स्थानावर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास हिंदुस्थानचा संघ चार मालिकांसह 360 गुणांची कमाई करीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियन संघ 296 गुणांसह दुसऱया आणि इंग्लंडचा संघ 292 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे.

नऊ देश… सहा मालिका… लॉर्डस्वर फायनल

आयसीसीकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी काही नियम तयार करण्यात आले होते. त्यानुसार नऊ कसोटी खेळणारे देश दोन वर्षांमध्ये सहा मालिका खेळतील. यामधून सर्वोत्तम ठरणाऱया दोन देशांमध्ये अंतिम फेरीचा सामना होईल. इंग्लंडमधील लॉर्डस् येथे हा सामना खेळवण्यात येईल. पण अद्याप एकाही संघाने सहा मालिका खेळलेल्या नाहीत. कोरोनामुळे वेळापत्रकावर फरक पडलेला आहे.