कोरोनाच्या काळातही आयपीएलमधून कोट्यवधींची कमाई

381

विवोने प्रायोजक पदावरून माघार घेतल्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये बीसीसीआय व संघ मालक यांना तोटा सहन करावा लागेल अशी दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनामधून मिळणारा 20 टक्के महसूल आम्हाला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी संघ मालकांकडून बीसीसीआयकडे करण्यात आली होती. मात्र हा 20 टक्के महसूल राज्य संघटनांना देण्यात येणार आहे असे सांगत बीसीसीआयने संघ मालकांची मागणी फेटाळून लावली, पण असे झाले तरी प्रत्येक संघ मालकाला यंदाच्या आयपीएलमधून 300 ते 320 कोटी मिळणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही संघ मालक मालामाल होतील यात शंका नाही.

राज्य संघटनांना वाऱयावर सोडणार नाही

यंदाची आयपीएल स्पर्धा ही यूएईत होतेय. त्यामुळे याचा फटका देशातील राज्य संघटनांना बसेल अशी शक्यता निर्माण झाली होती, पण बीसीसीआयने राज्य संघटनांना वाऱयावर सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. 20 टक्के महसूल त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थानात दरवर्षी आयपीएल स्पर्धा होत असते. आठ स्थळांवर या स्पर्धेच्या लढती पार पडतात. ज्या ठिकाणी लढती होतात, त्या राज्य संघटनांना बीसीसीआय व फ्रेंचायझींकडून प्रत्येकी 50 लाखांप्रमाणे आठ कोटी मिळतात. तसेच प्रत्येक संघ मालकाकडून 64 कोटींची कमाईही त्यांना करता येते.

संघ मालकांची यामधून होणार कमाई

ब्रॉडकास्टरच्या माध्यमातून प्रत्येक संघ मालकाला 200 कोटी मिळतील. विवो वगळता आयपीएलशी आणखी पाच अधिकृत पार्टनर जोडले गेले आहेत. यामधून प्रत्येक संघ मालकाला 12 कोटी मिळणार आहेत. नवा प्रायोजक मिळाल्यास प्रत्येक संघ मालकाला आणखी 12 ते 14 कोटी मिळतील. म्हणजे सेंट्रल रेव्हेन्यूमधून प्रत्येक संघ मालक 220 ते 230 कोटी कमवणार आहेत. यामधून खेळाडूंची फी व इतर खर्च वगळला तरीही प्रत्येक संघ मालक किमान 300 ते 320 कोटींची कमाई करील.

इतर जाहिरातींवर अवलंबून राहावे लागणार

विवो ही चिनी कंपनी आयपीएलमधून बाद झालीय. इतर चिनी कंपन्यांनीही यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलीय. त्यामुळे आयपीएल व बीसीसीआयला टीव्ही व डिजिटल माध्यमातून मिळणाऱया जवळपास 1500 ते 1700 कोटींच्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. इतर जाहिरातींमधून किती प्रमाणात महसूल मिळतोय यावरही सर्व काही अवलंबून असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या